बोदवड प्रतिनिधी । अवैधरित्या वाळूची वाहतूक करण्यासाठी आठ हजाराची लाच प्रकरणात बोदवडचे तहसीलदारांसह चार जणांना एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे.
तहसीलदार योगेश्वर नागनाथराव टोंपे (32, रा.केअर ऑफ के.जे. पाटील संताजी नगर, मुक्ताईनगर, मूळ रा.शिवकृपा निवास, शारदा नगर, देगलूर, जि.नांदेड), तहसीलदारांच्या वाहनावरील चालक अनिल रावजी पाटील (51, रा.चिखली, ता.बोदवड), बोदवड तलाठी मंगेश वासुदेव पारीसे (31, रा.राजा चंद्रकांत सोसायटी, बोदवड) व खाजगी पंटर शरद समाधान जगताप (25, रा.रूप नगर, बोदवड, ता.बोदवड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार यांचा वाळु वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांचे वाळू वाहतूक करणारे ढंपर २६ मार्च रोजी बोदवड तहसीलदारांनी बोदवड तालुका हद्दीतील सिंधी ते सुरवाडे गावाच्या दरम्यान रात्री थांबवले व सदर ठिकाणी तहसीलदार हे वाहनात बसलेले असतांना त्यांचा चालक व सोबत असलेला त्यांचा खाजगी पंटर यांनी नियमित हप्त्याचे २३ हजार रुपये जागेवरच वसुल केले शिवाय वाहन सोडण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली तसेच बोदवड तलाठी मंगेश पारीसे यांनी सुध्दा डंपरने वाळू वाहतूक करू देण्यासाठी दर महिन्याला तीन हजार रुपयांप्रमाणे लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार आज एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे.
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, मनोज जोशी, जनार्धन चौधरी, सुनील शिरसाठ, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ यांनी कारवाई केली.