नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेला स्थानिक दहशतवादी आदिल हुसेन ठोकर याच्या घरावर सुरक्षा दलांनी बॉम्बहल्ला केला. आदिल ठोकर उर्फ आदिल गुरी असे ओळखल्या जाणाऱ्या या दहशतवाद्यावर २२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या हल्ल्याचे नियोजन,अंमलबजावणी करतपाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. त्याच वेळी, या हल्ल्यात सहभागी असलेला आणखी एक स्थानिक दहशतवादी आसिफ शेख याचे त्राल येथील घर जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने बुलडोझरने नेस्तनाबूत करण्यात आले आहे.
लष्कराकडून समोर आलेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे स्टीलच्या गोळ्या, एके-४७ रायफल्स आणि बॉडी कॅमेरे घातलेल्या चार लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवाद्यांच्या गटाने हिंदू पर्यटकांना लक्ष्य केले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला, त्यापैकी बहुतेक पर्यटक होते आणि ते भारतातील विविध राज्यांमधून जम्मू आणि काश्मीरला भेट देण्यासाठी आले होते. दहशतवाद्यांमध्ये दोन स्थानिकांचाही समावेश होता. सूत्रांनी सांगितले की, दोन्ही स्थानिक दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. त्यांची नावे आदिल हुसेन ठोकर, रहिवासी बिजबेहरा आणि आसिफ शेख, रहिवासी त्राल अशी आहेत.
लष्करी सूत्रांनुसार, आदिल २०१८ मध्ये अटारी-वाघा सीमेवरून कायदेशीररित्या पाकिस्तानात गेला होता. पाकिस्तानमधील वास्तव्यादरम्यान त्याने एका दहशतवादी छावणीत प्रशिक्षण घेतले आणि गेल्या वर्षी तो जम्मू आणि काश्मीरला परतला. पहलगाम हल्ल्यातील काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काही दहशतवादी पश्तून भाषेत आपापसात बोलत होते. हल्ल्यात सहभागी असलेले सर्व दहशतवादी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचे होते, असे सूत्रांनी जोर देऊन सांगितले. मात्र , द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने देखील या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ते म्हणाले की टीआरएफ हा लष्कर-ए-तैयबाचा एक प्रमुख दहशतवादी गट आहे, ज्याचा वापर हा हल्ला एका स्थानिक गटाचे काम म्हणून दाखवण्यासाठी करण्यात आला होता.