पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४वरील बाभळे नाग फाट्याजवळ गुरुवारी दुपारच्या सुमारास बस व टँकर यांच्यात समोरासमोर अपघात झाल्याने नऊजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पारोळा येथून लोणीमार्गे कासोदा बस (एमएच१४/बीटी१८८१) सुटली होती. बाभळे नागफाट्याजवळ या बसला वळण आहे. याच ठिकाणी हा अपघात झाला. चालकाने विरुद्ध बाजूला जाऊन वळण घेण्याचा प्रयत्न केला असता यावेळी समोरून भरधाव वेगाने येणारी टँकर (एमएच १२/एक्सएम६०५७) यांच्यात समोरासमोर धडक झाली. सुदैवाने दोघांनीही समोरासमोर आल्यानंतर जोरदार ब्रेक मारल्याने मोठी हानी टळली. सर्व जखमींवर पारोळा कुटीर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
बसमधील प्रवासी वत्सलाबाई काशिनाथ मकासरे (सार्वे, ता. पारोळा), रंजना रमेश शिरसाठ (जायखेडे, ता. सटाणा), रमेश धर्मा शिरसाठ (जायखेडे, ता. सटाणा), प्रशांत प्रभाकर पाटील (लोणी, ता. पारोळा), लता विठ्ठल देसले (कोपरगाव), कल्पना भिमराव पाटील (मोरफळ, ता. पारोळा), सुरेखा दिनेश देवरे, दिनेश यशवंत देवरे (दोन्ही रावळगाव, ता. मालेगाव), अरुणाबाई पाटील (लोणी) हे जखमी झाले आहेत