मुंबई : वृत्तसंस्था
देशातील पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काश्मीरची सहल आयोजित केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही सहल आयोजित केली आहे. काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे. आम्ही तिथे जाण्यास घाबरत नाही. पर्यटकांना भारतात कुठेही जाण्याची भिती वाटू नये असा संदेश आम्हाला या प्रकरणी द्यायचा आहे, असे ते म्हणालेत.
पहलगाम अतिरेकी हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी गेला आहे. यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे. या घटनेमुळे जम्मू काश्मीरच्या पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने काश्मीरची सहल आयोजित केली आहे. मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे या प्रकरणी बोलताना म्हणाले की, पहलगाम हल्ल्यामुळे काश्मीरच्या नियोजित सहली रद्द करण्याचे प्रमाण वाढले आहे. पर्यटन हा काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. त्यामु्ळे मनसेने ही गोष्ट लक्षात घेऊन काश्मीर सहल आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या लोकांची काश्मीरला जाण्याची इच्छा आहे, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. काश्मीर सहलीची सुरुवात आम्ही आमच्यापासून करत आहोत. काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. तिथे जायला आम्ही घाबरत नाही. पर्यटकांना भारतात कुठेही जाताना भिती वाटता कामा नये. हाच संदेश आम्हाला यातून द्यायचा आहे.
काश्मीर पूर्णतः पर्यटनावर अवलंबून
ते पुढे म्हणाले, तुम्ही जिओ पॉलिटिक्स पाहिली तर अधिकाऱ्यांना यापूर्वी काश्मीरमध्ये मोठी मदत मिळायची. पण आता ही मदत बंद झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे तिथे इन्फ्रास्ट्रक्चर, उद्योग-धंदे वाढलेत. रोजगार वाढलेत. एक काश्मिरी तरुण सांगत होता. त्याची एक गाडी होती. पण पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे त्याने आणखी दोन गाड्या घेतल्या. आता स्थिती अशी आहे की, पर्यटन बंद झाले तर तो या गाड्यांचे हप्ते कसे भरणार? काश्मीर पूर्णतः पर्यटनावर अवलंबून आहे. तेच बंद पाडण्याचा डाव अतिरेकी व पाकिस्तानचा आहे.
हा डाव हाणून पाडायचा असेल तर देश म्हणून एकत्र येऊन आपण काश्मीरमध्ये पर्यटन केले पाहिजे. हेच दहशतवादाला चोख प्रत्युत्तर आहे. भारतीय नागरीक कोणत्याही स्थिती एकत्र येऊ शकतात हा संदेश गेला पाहिजे.
संदीप देशपांडे यांनी यावेळी जनतेला आपल्या सैन्य दलांवर विश्वास ठेवण्याचेही आवाहन केले. आम्ही अतिरेक्यांचा हेतू यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही काश्मीरमध्ये पर्यटनाला जाणार. आम्ही स्वतः त्याची सुरुवात करत आहोत. लोकांनीही आमच्यासोबत यावे. आमच्याशी संपर्क साधावा. या प्रकरणी आपल्या सैन्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असे ते म्हणाले.