देशातील जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतांना आता भाजपचे माजी खासदार आणि भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना ‘आयसिस काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बुधवारी, त्याने दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आणि एफआयआरसाठी औपचारिक तक्रार दाखल केली आणि त्याच्या कुटुंबासाठी सुरक्षेची मागणी केली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गौतम गंभीरने त्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप नेते गौतम गंभीर यांनी या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त करत ‘भारत या भ्याड कृत्याला प्रत्युत्तर देईल’ असे म्हटले होते.
गौतम गंभीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत,”ते मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करत आहेत. यासाठी पूर्णपणे जबाबदार असलेल्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. भारत हल्ला करेल” असे म्हटले होते. त्यानंतर त्यांना आता जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला. लष्कर-ए-तैयबाची प्रॉक्सी शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तथापि, उघडकीस आल्यानंतरही, पाकिस्तान अजूनही म्हणत आहे की या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा कोणताही सहभाग नाही. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, या हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही. जम्मू-काश्मीर पोलिस आणि सुरक्षा दल दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. त्यांनी चौकशीसाठी शेकडो लोकांना ताब्यात घेतले आहे.