मुंबई : वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरच्या रम्य थंड हवेत काही आनंदाचे क्षण घालवण्यासाठी गेलेल्या तिन्ही मावस भावंडांच्या कुटुंबांवर अचानक अतिरेक्यांनी घाला घातला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात घरातील कर्ते पुरुष अतुल मोने (43), संजय लेले (50) आणि हेमंत जोशी (45) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने डोंबिवलीत हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. यानंतर अतुल मोने यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, हिंदू कोण आहे विचारत गोळी घातली.
दरम्यान मोने कुटुंबियांनी सांगितले की, दहशतवादी आले तेव्हा सर्व जण घाबरले होते. दहशतवाद्यांनी कॉमनली विचारले इथे कोण-कोण हिंदू आहेत, मुसलमान आणि हिंदूंनी वेगळे व्हा, पण घाबरलेलो असल्याने सर्व जण खाली झोपले होते. त्यांनी प्रत्येकाला विचारले का नाही हे आम्ही पाहिले नाही पण त्यांनी इथे हिंदू कोण आहे म्हटल्यावर संजय लेले काकांनी हातवर केला. तेव्हा दहशतवाद्यांनी त्याच्या डोक्यात गोळी मारली.
ऋचा मोने यांनी सांगितले की, संजय लेले काका यांना गोळी मारल्यानंतर हेमंत जोशी काकांनी हे काय सुरू आहे, असा प्रश्न दहशवाद्यांना विचारला. पण त्यांचे काहीच ऐकून न घेता डायरेक्ट त्यांच्या तोंडावर गोळी मारली. माझे वडील (अतुल मोने) त्यांना समजून सांगत होते की कुणाला मारू नका, त्यावेळी वडिलांना काही होऊ नये म्हणून माझी आई वडिलांच्या पुढे येऊन उभी राहिली. पण दहशतवाद्यांनी वडिलांच्या पोटावर नेम लावत गोळी चालवली. तुम्ही लोकं येथे दहशत माजवत आहात. वडीलांना गोळी मारल्यावर मी घाबरले आणि भावाच्या जवळ गेले तेव्हा संजयकाकांच्या डोक्यातून रक्तवाहत होते.
अतुल मोनेंच्या पत्नी म्हणाल्या की, बैसरन व्हॅली हे पर्यटनस्थळ असूनही तिकडे कोणतीही सुरक्षाव्यवस्था नव्हती. पोलिसांची चौकी खाली होती. हिंदू कोण आहे असे विचारले असता संजय लेले यांनी हात वर केला आणि त्यांना ही गोळी मारण्यात आली. माझे पती आणि हेमंत जोशी यांनी दहशतवाद्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना गोळी मारण्यात आली.