नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर, भारत सरकारने आता दहशतवाद्यांना मुळापासून उखडून टाकण्याचा निर्धार केला आहे. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना उद्धवस्त केले जाईल. यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यासाठी वेळप्रसंगी सीमा ओलांडण्यास लष्कर मागेपुढे पाहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. ही बैठक पंतप्रधानांच्या दिल्लीतील ७ लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी जवळपास अडीच तास झाली.
गुरुवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते दहशतवादाविरोधात मोठा संदेश देतील, अशी शक्यता आहे. सदर बैठकीअगोदर, बुधवारी दिवसभर राजधानी दिल्लीमध्ये बैठकांचे सत्र सुरुच होते. सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमानतळावर सकाळी बैठक घेतली. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सैन्याच्या तिन्ही दल प्रमुखांची बैठकही झाली. त्यानंतर कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक झाली.
कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्याची जबाबदारी स्वीकारतील आणि त्यांच्या सूचनेनुसार इतर मंत्री काम करतील. कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरमधील सर्व परिस्थितीची माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. काश्मीरच्या पहलगामला भेट देऊन अमित शाह परतले आहेत. तेथील सर्व परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला आहे. त्याचीच माहिती त्यांनी पंतप्रधान मोदींना बैठकीत दिल्याचे समजते. परदेश दौऱ्यावरुन परतताच विमानतळावरच पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास सौदी अरेबियाहून दौरा अर्धवट सोडून परतले. नियोजीत दौऱ्यानुसार ते बुधवारी रात्री परतणार होते.
भारतात दाखल झाल्यानंतर दिल्ली विमानतळावरच त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक झाली. यामध्ये पंतप्रधानांना पहलगाम हल्ल्याची सविस्तर माहिती देण्यात दिली. त्यानंतर सुरक्षेसाठी आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आवश्यक ती सर्व कारवाई करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले.
राजधानी दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्च-स्तरीय बैठक झाली. या बैठकीत सुरक्षा परिस्थितीचा बैठकीत आढावा घेण्यात आला असून सैन्याच्या तिन्ही दलांना हाय अलर्ट मोडवर राहण्यास सांगण्यात आले असल्याचे समजते. यावेळी तिन्ही दलांच्या प्रमुखांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. ही बैठक सुमारे अडीच तास चालली. संरक्षणमंत्र्यांच्या उच्च-स्तरीय बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि हवाई दल प्रमुख ए. पी. सिंह उपस्थित होते. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि लष्करी कारवायांचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई हे देखील या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत दहशतवादी हल्ल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीच्या सर्व संभाव्य पैलूंवर चर्चा झाली, असेही सूत्रांनी सांगितले.
बैठकीत, लष्कर प्रमुख जनरल द्विवेदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा तपशीलवार आढावा सादर केला. यावेळी त्यांनी सैन्य तैनातीची माहिती लष्करप्रमुखांनी दिल्याचे समजते.