जळगाव : प्रतिनिधी
रात्रीच्या वेळी पथदिव्याखाली सुरू असलेल्या ‘तीन पत्ती’ जुगारावर शहर पोलिसांनी कारवाई करीत ११ जणांना ताब्यात घेतले. या ठिकाणाहून १३ हजार ८८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई २१ एप्रिल रोजी रात्री लाकूडपेठेत करण्यात आली.
एका घराच्या बाजूला पथदिव्यांच्या उजेडात तीन पत्ती हा जुगार सुरू असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यांनी सपोनि शीतलकुमार नाईक, रामचंद्र शिखरे, पोउनि महेश घायतड, सहायक फौजदार सुनील पाटील, पोहेकॉ किशोर निकुंभ, पोकॉ उद्धव सोनवणे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने लाकूडपेठेत जाऊन जुगार अड्ड्यावर कारवाई केली. तेथून ११ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण १३ हजार ८८० रुपये हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी पोकॉ. प्रणव पवार यांच्या फिर्यादीवरून ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.