जळगाव : प्रतिनिधी
महामार्गाला लागूनच असलेल्या ईच्छा देवी चौकातील अशोका लिकर गॅलरी या मद्यविक्रीच्या दुकानातून चोरट्यांनी रोख ७० हजार रुपयांसह १० लाख रुपयांचे दारूचे बॉक्स चोरून नेले. ही घटना बुधवारी (२३ एप्रिल) सकाळी उघडकीस आली. दुकानानजीक असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोरट्यांनी तोडफोड करीत डीव्हीआरही चोरून नेला.
सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ येथील अशोक नागराणी यांचे जळगावात शहरातील ईच्छादेवी चौकात महामार्गालगत अशोका लिकर गॅलरी नावाने मद्य विक्रीचे दुकान आहे. मंगळवारी मध्यरात्री दुकान बंद असताना, चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकवून आत प्रवेश केला. त्यांनी गल्ल्यातून ७० हजार रुपये रोख, १० लाख रुपये किमतीचे दारूचे १२६ बॉक्स चोरून नेले. चोरी करण्यापूर्वी दुकानाच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोरट्यांनी तोडफोड केली. त्यानंतर ते आत शिरले. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआरदेखील चोरुन नेला. त्यामुळे पोलिसांना माहिती गोळा करताना अडचण येत आहे.
ज्या दुकानात चोरी झाली आहे ते महामार्गाला लागूनच आहे. शिवाय दुकानाच्या बाजूला रस्ता ओलांडला की जवळच पोलिस चौकी आहे. पोलिस चौकीपासून काही अंतरावरच एवढी धाडसी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बुधवारी (२३ एप्रिल) सकाळी कामगार दुकानावर आले, त्यावेळी ही घटना समोर आली. त्यांनी घटनेची माहिती जिल्हापेठ पोलिसांना दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, जिल्हा पेठ पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी घटनास्थळी पोहचले. तसेच ठसे तज्ज्ञ, फॉरेन्सिक टीमही दाखल झाली.