मुंबई : वृत्तसंस्था
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये मंगळवारी दुपारी २.४५ वाजता झालेल्या या हल्ल्यात २० हून अधिक लोक जखमी झाले. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम हल्ल्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा अतिशय चीड आणणारा हल्ला आहे. त्यात निष्पाप नागरिकांची त्यांचा धर्म विचारून हत्या करण्यात आली. हा देशात व समाजात उभी फूट पाडण्याचा प्रयत्न असून, हल्लेखोरांवर अतिशय कडक व टोकाची कारवाई होईल याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असे ते म्हणालेत. महाराष्ट्रातीय सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचे मृतदेह आज राज्यात आणले जातील. मुंबईत आशिष शेलार व मंगलप्रभात लोढा हे दोन मंत्री सर्व व्यवस्था पाहत आहेत. पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या प्रकरणात लक्ष घालत आहेत. तेथील विमानतळावर मंत्री माधुरी मिसाळ सर्व व्यवस्था पाहत आहेत. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन स्वतः श्रीनगरला पोहोचत आहेत. ते तिथे जाऊन तिथे अडकलेल्या पर्यटकांशी समन्वय साधतील.
याशिवाय ज्या पर्यटकांनी सोशल मीडिया किंवा मेसेजद्वारे प्रशासनाशी संपर्क साधला आहे, त्या सर्वांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेत. काही लोकांना इंडिगोच्या विशेष विमानाने आज परत आणले जाणार आहे. आज दिवसभर आढावा घेतल्यानंतर उद्या एखादे विशेष विमान उपलब्ध करून देण्याच्या मुद्यावर मी मुरलीधर मोहोळ यांना विनंती केली आहे. यासंबंधी तिकिटांची व्यवस्था सरकार करेल.
ते पुढे म्हणाले, सद्यस्थितीत आपले सर्व पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित आहेत. पण ते घाबरलेत. ही घटना घडल्यामुळे ते लवकरात लवकर महाराष्ट्रात परतण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारही त्यांना रस्ते किंवा हवाई मार्गाने परत आणण्याचा प्रयत्न करत आहे. मंत्रालयातील वॉररुमही सक्रिय करण्यात आली आहे. त्या ठिकाणाहून सर्वांना माहिती देता येईल किंवा घेता येईल.
जम्मू काश्मीरचे प्रशासन या प्रकरणी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहे. त्यांना एखादी गोष्ट विचारली तर तत्काळ त्याचे उत्तर मिळत आहे किंवा ते तशा पद्धतीची व्यवस्था करत आहे. जखमींवर योग्य प्रकारचे उपचार सुर आहेत. डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्यांना इकडे आणण्याचे प्रयत्न केले जातील. त्यांच्या कुटुंबीयांना इकडे लवकर यायचे असेल तर सरकार त्याचीही व्यवस्था करेल. या प्रकरणी खोऱ्यात अडकलेल्या पर्यटकांचा निश्चित आकडा आमच्याकडे उपलब्ध नाही. प्रशासनाशी जसा – जसा संपर्क केला जात आहे, त्यातून हा आकडा निश्चित केला जात आहे.
या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडलेत, त्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत केली जाईल. अर्थात पैशाने कुणाचेही जीवन परत येत नाही. पण एक आधार म्हणून आपण ते देतो. ही मदत त्यांना दिली जाईल. सरकार या प्रकरणी जे काही करता येईल ते करत आहे. मी स्वतः यात लक्ष घालत आहे. एकनाथ शिंदे व अजित पवारही त्यांच्या परीने या प्रकरणात लक्ष घालत आहेत. आपल्या राज्यातील पर्यटकांना अत्यंत सुरक्षितपणे परत आणण्यास सध्या आम्ही प्राधान्य दिले आहे, असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, हा अतिशय चिड आणणारा हल्ला आहे. त्यात धर्म विचारून निष्पाप नागरिकांची हत्या करण्यात आली. हा देशात व समाजात उभी फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या हल्ल्यातील मास्टरमाईंडला शोधून काढतील. त्यांनी यापूर्वीही असे केले आहे. या प्रकरणी अतिशय कडक व टोकाची कारवाई होईल याविषयी माझ्या मनात शंका नाही.