नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील काश्मीर खोर्यातील पहलगाम येथील बैसरन येथे लष्करी गणवेशात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 30 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जखमी आहेत. मृतांत दोन परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार करत स्वर्गभूमीवर रक्ताचा सडा सांडला. दरम्यान, सौदी अरेबिया दौर्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले. तत्पूर्वी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना संपर्क करून परिस्थितीची माहिती घेतली. गृहमंत्री शहा हेही तातडीने काश्मीरला रवाना झाले असून आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. या हल्ल्यावर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिसराला वेढा घालून शोध मोहीम सुरू केली आहे. मात्र, उशिरापर्यंत दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्यांची अधिकृतपणे ओळख पटली नव्हती.
लष्करी गणवेशात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. त्यामुळे मृतांचा आकडा वाढल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. हल्ल्याच्या वेळी घटनास्थळी असलेल्या एका महिलेने आपल्या पतीच्या डोक्यात गोळी लागली आहे, तर इतर काही पर्यटक या हल्ल्यात जखमी झाले आहेत, अशी माहिती एका पर्यटक महिलेने ओळख उघड न करता वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी तातडीने हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली; तर काही जखमींना स्थानिक नागरिकांनी खेचर आणि घोड्यांवरून खाली आणले. 15 जखमी पर्यटकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे पहलगाम रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
बैसरन हे झेलम नदीच्या खोर्यातील सुंदर पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे या हंगामात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. दुपारी पर्यटक काश्मीरच्या स्वर्गीय निसर्गसौंदर्याचा आनंद लुटत असताना अचानक लष्करी गणवेशातील दोन दहशतवादी आले आणि त्यांनी प्रथम पर्यटकांची नावे विचारली. त्यानंतर अंदाधुंद गोळीबार करत पळ काढला. मृत आणि जखमीत काही स्थानिक नागरिकांसह गुजरात, ओडिशा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. त्यांची ओळख खालीलप्रमाणे आहे:
या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान समर्थित ‘कश्मीर रेझिस्टन्स’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. गैरस्थानिक नागरिकांना 85 हजारहून अधिक निवास प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत. यामुळे येथे लोकसंख्याशास्त्रीय बदलांचा मार्ग मोकळा झाला आहे. हे गैरस्थानिक नागरिक पर्यटक म्हणून येतात, निवास प्रमाणपत्र मिळवतात आणि मग जमिनीचे मालक असल्याप्रमाणे वागतात. त्यामुळे बेकायदेशीरपणे स्थायिक होण्याचा प्रयत्न करणार्यांविरुद्ध आम्ही असाच हिंसाचार करू, असे ‘कश्मीर रेझिस्टन्स’ने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले आहे.