चाळीसगाव : प्रतिनिधी
तोंडाला रूमाल बांधून चोरीच्या उद्देशाने संशयितरीत्या फिरणाऱ्या मालेगावच्या तरुणाला मंगळवारी चाळीसगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर पोलिस कायदा कलम १२२ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे हवालदार अजय पाटील, पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटोळे, विलास पवार, समाधान पाटील हे मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शहरातील सराफ गल्ली परिसरात रात्री पेट्रोलिंग करीत असताना एक इसम अंधारात तोंडाला रूमाल बांधून चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत होता. त्यास ताब्यात घेतले. त्याची विचारपूस समाधानकारक केली असता तो उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. मोहम्मद सुब्राती मोहम्मद रफीक (२५, बिस्मिल्लाह नगर, मालेगाव, जि. नाशिक) असे त्याचे नाव असून, त्याच्या अंगझडतीत स्क्रू ड्रायव्हर व चार चाव्यांचा गुच्छा मिळून आला. पोलिसांनी संशयित मोहम्मद सुब्राती मोहम्मद रफीक यास ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध पोकॉ. विलास पवार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२२ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.