मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून आधी महायुतीत नाराजी होती मात्र केंद्राचे आदेश आल्यानंतर नाराजी थंड झाली होती आता मात्र भाजपच्या मंत्र्यांने केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात नवीन चर्चा सुरु झाली आहे.
मी एक मंत्री आहे, वरिष्ठ मंत्री आहे. महाराष्ट्रात फक्त गृहखाते राहिले, बाकी सर्व खाती झाली, असे विधान भाजप नेते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तासगाव येथे शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. या मंडळातर्फे दुर्गामाता मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात ते उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महिलांच्या सर्व आजारांच्या संदर्भात एक मोफत रुग्णालय उभारले जाईल, असे आश्वासन देखील दिले आहे.
दुर्गामाता मंदिर लोकार्पण सोहळ्यात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, महिलांच्या सर्व आजारांवर मोफत उपचार करणारे एक रुग्णालय उभारले जाईल. तसेच जिजामातांच्या नावाने महिलांच्या आजारासंबंधीचे एक क्लिनिक उभारले जाईल. यात रक्ततपासणी मोफत, इंजेक्शन मोफत, औषधी, प्रसूती, शस्त्रक्रिया असे सगळे मोफत केले जाईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले आहे.
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ही काही सरकारी योजना नाही. सरकारी योजना वेगळ्या आहेत. मी मंत्री आहे. एक वरिष्ठ मंत्री आहे. महाराष्ट्रात फक्त गृहखाते राहिले, बाकी सर्व खाती झाली आहेत, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी गृहखात्याविषयीची इच्छा बोलून दाखवली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मी मंत्री आहे, तरीही माझी अशी धारणा आहे की, आयजीच्या जिवावर बायजी उद्धार असे कशाला हवे. सरकारच्या योजना मी कशाला चालवायच्या. सरकार त्या योजना चालवेल. पण मग मी काय करणार? मी माझ्या खिशात हात घालणार की नाही? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच सध्या एकच योजना सांगितली. महिलांनी एकत्र येऊन नव्या-नव्या गोष्टी समोर आणाव्यात.
महिलांना उपयोगी पडणारे उपक्रम मंडळाने करावेत. व्यसनी तरुणाला तुमच्या मंडळाचे सदस्य ठेवू नका. तंबाखू खाणाऱ्यालाही घेऊ नका. काही देशातील तरूण पिढी उद्ध्वस्त झाली. त्या देशांची लोकसंख्या कमी होतेय. तो देश चालवायला भारतीय तरुण लागतात. जर्मनीने महाराष्ट्राला चार लाख पोरं मागितली आहेत. आपण 10 हजार तरुण पाठवले आहेत. बाकीची पाठवली आहेत. आगामी काळात आपली तरुणाई जपली नाही, तर अशीच स्थिती होईल, अशीही भीती चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.