भुसावळ : प्रतिनिधी
रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका निवृत्त पोलिसाची तब्बल ९ लाख ६४ हजार ६० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वसंत जानबाजी ढोणे (वय ६६), रा. फेकरी यांनी प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल (रा. गडकरी नगर, खडका रोड, भुसावळ) याच्याविरोधात भुसावळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, वसंत ढोणे हे २०१७ मध्ये जी.आर.पी. रेल्वे पोलिस दलातून निवृत्त झाले आहे.. त्यांचा मुलगा वैभव सध्या पुण्यात काम करत आहे. तर त्यांची ओळखीची महिला रेखाबाई सोनवणे हिने प्रशांत अग्रवाल नावाच्या व्यक्तीमार्फत रेल्वेत नोकरी लावता येईल, असे सांगितले. दुसऱ्याच दिवशी अग्रवाल यांची भेट घेतली असता त्याने मुलाला रेल्वेमध्ये हेड क्लार्क पदावर नोकरी लावून देतो, असे सांगितले व एकूण ७ लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार ढोणे यांनी ४ लाख रुपये सुरुवातीस दिले. उर्वरित रक्कम वेळोवेळी रोख व डिमांड ड्राफ्टद्वारे दिली. त्यानंतरही आणखी पैशांची मागणी करून एकूण ९,६४,०६० रुपये उकळण्यात आले व नोकरी लावली नाही.



