सध्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कडाक्याचे उन सुरु आहे. उन्हाळ्यात थंडगार आणि गोड खाण्याची मजा काही औरच असते. अशा वेळी आइसक्रीम आणि कुल्फीसारख्या गोष्टी लोकांना विशेष आवडतात. बाजारात विविध प्रकारच्या कुल्फी सहज मिळतात, पण रोज खाण्यासाठी बाहेरची कुल्फी आरोग्यासाठी चांगली नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला घरच्या घरी करता येईल अश्या स्वादिष्ट कुल्फीची रेसिपी सांगणार आहोत.
आज आपण तुम्हाला दोन प्रकारच्या कुल्फी – रोज कुल्फी आणि दूध कुल्फी – कशा तयार करायच्या हे सोप्या भाषेत सांगणार आहोत. या दोन्ही रेसिपी तुम्ही सहज घरी बनवू शकता आणि तुमच्या आवडीनुसार गोडी कमी-जास्त करू शकता.
रोज कुल्फी:
साहित्य:
- दूध
- मिल्क पावडर
- मावा
- गुलाबाच्या स्वच्छ पाकळ्या
- रोज सिरप
- साखर
- ड्रायफ्रूट्स
कृती:
- सर्वप्रथम गॅसवर मंद आचेवर दूध उकळा.
- त्यात मिल्क पावडर घालून नीट ढवळा.
- नंतर त्यात मावा घालून दूध सतत हलवत राहा.
- दूध थोडं घट्ट झाल्यावर त्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि रोज सिरप घाला.
- साखर घालून मिक्स करा.
- थोडं थंड झाल्यावर त्यात ड्रायफ्रूट्स घाला.
- मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर कुल्फीच्या साच्यात ओता, वरून गुलाब पाकळ्या घालून फ्रीझरमध्ये सेट करा.
दूध कुल्फी:
साहित्य:
- फुल क्रीम दूध
- साखर
- बदाम
- कॉर्नफ्लॉर
- बर्फ
- मीठ
कृती:
- कढईत फुल क्रीम दूध उकळायला ठेवा (लोखंडी किंवा अॅल्युमिनियमची कढई सर्वोत्तम).
- सतत हलवत राहा, साई जिथे जाईल तिथून खरवडून पुन्हा दुधात मिसळा.
- दूध निम्मं झाल्यावर त्यात बदामाचे काप आणि साखर घाला.
- थोडं पाणी घेऊन त्यात कॉर्नफ्लॉर मिसळा आणि गाठी होणार नाहीत याची काळजी घ्या
- जेव्हा दूध एकतृतीयांश होईल, तेव्हा कॉर्नफ्लॉर घालून सतत हलवा.
- दूध क्रीमी झालं की गॅस बंद करा आणि ते थोडं थंड होऊ द्या.
- नंतर कुल्फीच्या साच्यात ओता. हे साचे मोठ्या भांड्यात क्रश केलेल्या बर्फात आणि मीठात ठेवा.
- काही वेळात ही कुल्फी छान सेट होईल आणि बाजारातील कुल्फीसारखे टेक्सचर येईल.