पाचोरा : प्रतिनिधी
बंद घरांचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी एका रात्री एकाच चाळीतील तीन घरे फोडून रोकड व दागिन्यांसह देव्हाऱ्यातील चांदीच्या मूर्तीही चोरून नेल्याची घटना शहरातील पुनगाव शिवारातील विद्यानगर भागात घडली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा शहरातील पुनगाव शिवारातील विद्यानगर भागात राहणाऱ्या भाडेकरूंची तीन घरे बंद अवस्थेत होती. तिघेही भाडेकरू वेगवेगळ्या ठिकाणी बाहेरगावी कार्यक्रमास गेले होते. हीच संधी साधत १८ रोजी मध्यरात्रीनंतर जिवेश राजेंद्र चिंचोले यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी प्रवेश करीत कपाट उघडून त्यातील काही रोकड लांबवली असून त्यांच्या घरातील देव्हाऱ्यातील चांदीचे देवही चोरट्याने चोरून नेले
त्यांच्या शेजारील भगवान हिलाल पाटील हेदेखील बाहेरगावी असल्याने त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडण्यात आला व कपाटातील किरकोळ दागिने व रक्कम देखील चोरून नेल्याचे आढळून आले. १९ रोजी सकाळी शेजारच्यांनी बंद घरे तोडल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांना फोन करून खबर देण्यात आली.
यावेळी पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापही चोरट्यांना पकडण्यात यश आले नाही. दरम्यान, बाहेरगावी गेलेले घरमालक घरी परत आले नसल्याने अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच या चोऱ्यांमध्ये नेमका किती मुद्देमाल चोरीस गेला, याचीही माहिती मिळू शकली नाही. पाचोरा शहरात दिवसागणिक चोरट्यांचे प्रमाण वाढत असून पोलिसांपुढे एक आव्हान उभे राहिले आहे.