धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील मुसळी फाट्याजवळील उड्डाणपुलाखालील बोगद्यात पाळधी येथून पिंप्री खुर्द येथे मका विक्रीसाठी घेऊन जाणारे ट्रॅक्टर समोरून अचानक वाहन आल्याने उलटले. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ मुसळी फाटा येथे पुलाखालून जात असलेले मक्याचे ट्रॅक्टर वळत असताना समोरून धरणगावकडून अचानक वाहन आल्याने उलटले. याठिकाणी गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट धावतात. त्यामुळे रोज किरकोळ अपघात होत आहेत. एखाद्या वेळेस मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. वराडकडे जाताना व जळगावकडून येताना वाहने भरधाव वेगाने धावतात. पुलाखालील रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. शनिवारी दुपारी १ वाजता मक्याने भरलेला ट्रॅक्टर पुलाखाली उलटला. याठिकाणी बाजूला असलेला उसाच्या रस विक्रेता सुदैवाने बचावला.
शेतकऱ्याने हा मका पुन्हा भरून विक्रीसाठी रवाना केला. मात्र, या घटनेमुळे शेतकऱ्याला खूप त्रास सहन करावा लागला. ट्रॉली सरळ करून पुन्हा दुसऱ्या ट्रॉलीमध्ये मका भरून शेतकरी मार्गस्थ झाला.