छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील छत्रपती संभाजीनगर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बायजीपुरा परिसरात दुहेरी हत्याची घटना घडली आहे. यात सलमान खान आरेफ खान (30) आणि त्याचा साला सुलतान शेख (17) असे हत्या झालेल्यांची नावे आहेत. दुचाकीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोघांच्या डोक्यावर तसेच चेहऱ्यावर दगडाने ठेचून ही हत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 12.30 च्या सुमारास शेख आसिफ शेख हाफिज (रा. सिल्लोड) याचा फोन आला होता. यावेळी बोलताना त्याने सुलतानने त्याची गाडी परत केली नसल्याचा राग व्यक्त केला होता. पोलिस सारखे त्याच्या घरी येत असल्याने तो सुलतानला सोडणार नसल्याची धमकी दिली. या माहितीच्या आधारे इम्रान खान यांनी शेख आसिफवर दोघांच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे. जिन्सी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
फिर्यादी इम्रान खान आरेफ खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 7 वाजेच्या सुमारास चंपा चौकात असताना त्याच्या चुलत भावाने येऊन सलमान व सुलतानवर हल्ला झाल्याची माहिती दिली. यात सलमान जागीच ठार झाला तर सुलतानला उपचारासाठी घाटी रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला. इम्रान आणि त्याची पत्नी घटनास्थळी पोहोचले असता पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी मृत हा त्यांचा सख्खा भाऊ सलमान असल्याचे सांगितले. सलमानचा चेहरा दगडाने ठेचल्याचे दिसून आले. सुलतानवरही गंभीर हल्ला करत खून केला आहे.