चाळीसगाव : प्रतिनिधी
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रांजणगाव फाट्याजवळ रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे लुटीचा प्रकार यशस्वी होऊ शकला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलिसांना गस्तीदरम्यान, रांजगणाव येथील २३ वर्षीय तरूण हाती लागला. त्याच्याजवळ धारदार चाकू मिळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. मात्र तक्रार न आल्याने गुन्हा दाखल झाला नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक राहुल पवार यांनी दिली. शुक्रवारी रात्री एक क्रुझरचालक चाळीसगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रांजणगाव फाट्याजवळ दोन तरुण दगडफेकीत वाहनाच्या अपघात झाल्याचा बनाव करून रस्त्यावर दुचाकी आडवी लावून ते रस्त्यावर आडवे पडले होते.
कुझरमधील वाहनधारकांना अपघात झाला असावा व मानवतेच्या भूमिकेतून सहकार्य करावे म्हणून थांबले असता त्यातील एकाने रस्त्यावरून उठून वाहनाची चावी काढत वाहनधारकाला लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनधारक व चोरटा यांच्यात झटापटही झाल्याचे सांगण्यात येते. याचदरम्यान चाळीसगाव येथील युवा उद्योजक राज पुन्शी कन्नडकडून चाळीसगावकडे येत असताना त्यांचेही वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुन्शी यांनी हळू केलेले वाहन जोरात चालवण्याचा प्रयत्न केला असता एका चोरट्याने त्यांच्या वाहनावरही दगडफेक केली. त्यात दगड वाहनाच्या बोनेटवर लागल्याने वाहनाची काच फुटली.