भडगाव : प्रतिनिधी
वृंदावन, मथुरा यात्रेसाठी निघालेल्या भाविकाचा रस्त्यातच मृत्यू झाला. या घटनेमुळे गुढे येथील बाविस्कर कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गुढे येथील मूळ रहिवासी आणि बोईसर येथे कामानिमित्त वास्तव्यास असलेले प्रवीण रूपचंद बाविस्कर हे बोईसर येथून एका खाजगी यात्रा कंपनीच्या माध्यमातून वृंदावन, मथुरा येथे आठ दिवसांच्या यात्रेकरिता गेले होते. त्यांच्यासह एकूण ६० भाविक निघाले होते. या प्रवासात त्यांच्यासोबत मुलगा पत्नीदेखील होते. बोईसर ते मनमाड हा प्रवास भाविकांनी खाजगी बसने केला. तेथून मनमाड ते वृंदावन जाण्याची व्यवस्था यात्रा कंपनीने रेल्वेने केली होती. मनमाड येथून रेल्वेमध्ये बसल्यानंतर बाविस्कर यांना छातीत त्रास जाणवू लागल्यावर त्यांना चाळीसगाव स्टेशनवर थांबवून रेल्वे पोलिस मुजम्मिर रहिमान शेख यांनी चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चाळीसगाव येथे शवविच्छेदन करून बुधवारी त्यांच्यावर मूळ गावी गुढे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात पत्नी, मुलगा, तीन भाऊ, पुतणे असा परिवार आहे. ते गुढे येथील धीरज बाविस्कर यांचे काका होत.