नांदेड : वृत्तसंस्था
वसमत तालुक्यातील नांदेड रस्त्यावरील गिरगाव पाटीजवळील विशाल धाब्यासमोर कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी (दि.१९) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. विशाल गजानन गवळी (वय २५, रा. सिंदगी ता. कळमनुरी) असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याचे ३० एप्रिलरोजी लग्न होते. त्याच्या अपघाती निधनावर हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील विशाल गवळी दुचाकीवरून (एमएच 38 ए.एच.8017) नांदेडहून वसमतकडे येत होता. तर वसमतहून कार (एमएच 22 बी.सी. 4374) नांदेडकडे जात होती. यावेळी कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत विशाल जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. विशाल गवळी याचे 30 एप्रिलरोजी लग्न होते. परंतू, लग्नापूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याच्या पश्चात एक भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. या घटनेने सिंदगी गावावर शोककळा पसरली आहे.