जळगाव : प्रतिनिधी
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून जयेश अरविंदकुमार मेहता (४९, रा. प्रेमनगर) या शिक्षकाची १४ लाख ८३ हजार ५२५ रुपयांमध्ये फसवणूक केली. सुरुवातीला २० हजार रुपयांचा परतावा देत विश्वास संपादन केला. मात्र, नंतर वेळोवेळी रक्कम घेऊन ही फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २२ फेब्रुवारी ते ९ एप्रिल यादरम्यान घडला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षक असलेले जयेश मेहता यांच्याशी २२ फेब्रुवारी रोजी दोन जणांनी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास ५० टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवत एका अॅपवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. २० हजार रुपये परतावा सुरूवातीला देत विश्वास संपादन केला. सुरुवातीला गुंतवणूक केलेल्या रकमेवर मेहता यांना २० हजार रुपये परतावा देण्यात आला. त्यातून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे शिक्षक गुंतवणूक करीत गेले. मात्र, नंतर त्यांना कोणताही परतावा व मूळ रक्कम मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मेहता यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश शर्मा करीत आहेत.