जळगाव : प्रतिनिधी
ट्रान्सपोर्ट नगरमध्ये खोली घेऊन राहत असलेले मयूर उर्फ जयंत संजय पाटील (२८ मूळ रा.आमोदा, ता. यावल) या कंपनीत सुपरवायझरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (१७ एप्रिल) रोजी सायंकाळी घडली. आत्महत्येपूर्वी ते मित्रांशी बोलले होते, नंतर त्यांचा संपर्क होऊ शकला नाही व ही घटना समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर पाटील हे एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला होते. गुरुवारी दुपारी ते त्यांच्या मित्रांशी मोबाईलवर बोलले. त्यानंतर त्यांचा संपर्क न झाल्याने एका मित्राने मयूर यांच्या खोलीवर जाऊन पाहिले असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. मयताच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.