मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गतवर्षी सारखाच यंदाही दहावी व बारावीचा निकाल मे महिन्यातच लागण्याची शक्यता आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्वतः तसे संकेत दिलेत. त्यांच्या माहितीनुसार, या दोन्ही वर्गांचे निकाल 15 मेपर्यंत लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकतीच दहावी व बारावीची परीक्षा घेतली होती. आता या परीक्षांच्या निकालाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ही उत्सुकता लवकरच संपण्याची शक्यता आहे. कारण, यासंबंधी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बोर्डाचा दहावी व बारावीचा निकाल 15 मेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. पण बोर्डाने याविषयी अद्याप कोणतीही निश्चित अशी तारीख जाहीर केली नाही.
उल्लेखनीय बाब म्हणजे गतवर्षी बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर आठवड्याभराने म्हणजे 27 मे रोजी दहावीचा निकाल लागला होता. दहावी व बारावी या दोन्ही परीक्षांत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान 35 टक्के गुण आवश्यक असतात. याशिवाय विद्यार्थ्यांना ग्रेडही दिले जातात. ग्रेडिंग व्यवस्थेनुसार, 75 टक्के व त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना डिस्टिंक्शन मिळणार आहे.
आता पाहू कुठे पाहता येईल ऑनलाईन निकाल?
mahahsscboard.in mahresult.nic.in hscresult.mkcl.org msbshse.co.in mh-ssc.ac.in sscboardpune.in sscresult.mkcl.org hsc.mahresults.org.in
कसा चेक करायचा निकाल?
- सर्वप्रथम बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
- क्लिक करताच नवीन विंडो उघडेल.
- नव्या विंडोत योग्य ती माहिती भरून सबमिटच्या बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- हा निकाल डाऊनलोड करता येईल.