जळगाव : प्रतिनिधी
पेट्रोल आणि गुटखा विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून हप्ता स्वीकारल्याचा व्हिडीओ थेट पोलिस अधीक्षकांना पाठविण्यात आला असून त्याची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे गजानन देशमुख व संघपाल तायडे या दोन कर्मचा-यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. देशमुख यांची पाचोरा तर तायडे यांची फत्तेपूर (जामनेर) पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
तर ड्रग्स प्रकरणात फरार असलेल्या आरोपीशी २५२ वेळा संपर्कात असल्याच्या कारणावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्ता पोटे यांना पोलिस मुख्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलतांना दिली. उपनिरीक्षक दत्ता पोटे यांचा ड्रग्स प्रकरणात आरोपीशी संवाद झालेला आहे. त्याच्या रेकॉडींग तपासण्यात आल्या आहेत. आतापर्यंतच्या रेकॉर्डीगनुसार आक्षेपार्ह आढळून आलेले नाही, मात्र याप्रकरणी चौकशी सुरु आहे. काही गैरप्रकार आढळला तर कठोर कारवाई केली जाईल, असे रेड्डी यांनी सांगितले. सध्या त्यांना पोलिस मुख्यालयात जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले गजानन देशमुख व संघपाल तायडे यांनी कंडारी, ता. जळगाव येथील एका दुकानदाराकडून हप्ता म्हणून रोख रक्कम स्विकारली, त्याचा व्हिडीओ एका व्यक्तीने थेट पोलीस अधीक्षक रेड्डी यांना पाठविला. त्याची दखल घेत दोघांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. गेल्या आठवड्यात पाचोरा येथे तीन पोलिसांनी ट्रक चालकाकडून ५० रुपयाची लाच घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात तीन पोलिसांना निलंबित केले होते.