पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात तापमान वाढले असतांना अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत असतांना आता पुण्यातील खेड शिवापूरजवळ अचानक बसला आज भरदुपारी आग लागण्याची घटना घडली. या आगीत बस पूर्णत: जळून खाक झाली असून फक्त सांगाडा उरला आहे. प्रवाशांनी आग लागल्याचे समजताच जीव वाचवण्यासाठी बसबाहेर उड्या मारल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरकडून पुण्याच्या दिशेने ही बस जात होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही बस नवीन कात्रज बोगदा शिंदेवाडी येथे आली असता, बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागला आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. या बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते. वाहन चालकाने प्रसंग अवधान दाखवून बस महामार्गावरती रस्त्याच्या कडेला घेतली. आग लागल्याचे समजताच या प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी बसमधून बाहेर उड्या मारल्या. बसला आग लागल्यानंतर रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली होती.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच सर्वप्रथम डब्ल्यूओएम कंपनीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीची तीव्रता मोठी असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. सोबतच जळणाऱ्या बसमध्ये स्फोट होत असल्यामुळे आग आटोक्यात येण्यास उशीर झाला. तोपर्यंत बस खाक झाली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, प्रवाशांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रवाशांच्या सामानासह बसमधील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली? हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.