बुलढाणा : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांच्या केस गळतीचा प्रकार समोर आला होता. आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. केस गळतीनंतर आता नागरिकांच्या नखांची गळती होत आहे. मागील आठ दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. जे केस गळतीचे रुग्ण होते, त्यांच्यातच नखे गळतीचे समस्या जाणवत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सेलेनियमचे वाढत्या प्रमाणामुळे ही समस्या होत असल्याचा अंदाज आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या डिसेंबर महिन्यापासून अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते. आता केस गळती झालेल्या रुग्णांना नखे गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या रुग्णांनी नखे अचानक विद्रुप होऊन कमजोर होत आहेत. तर अनेकांची नखे अक्षरशह गळून पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. केवळ हातांची नखे नाही तर पायांची नखेही गळून पडत आहेत. चार गावांमध्ये सध्या एकूण 29 रुग्णांवमध्ये ही समस्या उद्भवली आहे. केस गळतीनंतर नखांची गळती होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
याबाबत बुलढाणा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बनकर यांनी म्हटले की, एकूण चार गावांमध्ये नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आले आहेत. काही रुग्णांमध्ये नखांची गळती होत आहे. चार गावांमध्ये सध्या एकूण 29 रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे सांगण्यात आले आहे. सेलेनियमचे वाढत्या प्रमाणामुळे ही समस्या होत असल्याचा अंदाज आहे. जे केस गळतीचे रुग्ण आहेत, त्यांच्यामध्ये सध्या नखं गळतीची समस्या जाणवत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.