मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना ठाकरे गटाचा नाशिकमध्ये निर्धार मेळावा पार पडला. राज्यातील शिवसैनिकांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न या शिबीराच्या माध्यमातून ठाकरेंकडून करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागातील ठाकरे गटातील कार्यकर्ते शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी ठाकरे गटाकडून निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सुरवातीला एआयचा वापर करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात संदेश दाखविण्यात आला. हाच धागा पकडत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
स्वतःचा आवाज कोणी ऐकत नाही म्हणून आता आपले विचार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकविण्याचा पोरकटपणा फक्त ‘उबाठा’ गटच करू शकतो. ज्या गोष्टींसाठी बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, किमान त्याच्याविरोधात बाळासाहेबांचा आवाज वापरू नये. त्यांचे विचार बुडविलेत, किमान त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर करू नका. आज बाळासाहेब असते तर यांच्या बुडावर लाथच घातली असती, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आपला आवाज कोणी ऐकत नाही, म्हणून आपले विचार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा करण्यात आला आहे. मला खात्री आहे, आज ज्यांनी बाळासाहेबांना जनाब ठरविले, ज्यांनी टिपू सुलतानाचे नाव उद्यानांना दिले, वीर सावरकरांचा सकाळी अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या गळ्यात सायंकाळी गळे घातले.
वक्फच्या विरोधात मतदान केले, राम मंदिराला सातत्याने विरोध करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, कलम ३७० रद्द करण्यास विरोध करणाऱ्यांना पाठिंबा दिला, वाझेसारख्यांकडून वसुली करवून घेतली, ज्या गोष्टींसाठी बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, किमान त्याच्याविरोधात बाळासाहेबांचा आवाज वापरू नये. त्यांचे विचार बुडविलात, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं.