रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील मोठा वाघोदा रोडलगत असलेल्या शेतातील विहिरीतून देवेंद्र भागवत सोनवणे (वय २७, रा. निंभोरा, ता. रावेर) या तरुणाचा मृतदेह काढत होते. यावेळी विहिरीतून आणखी एक मानवी सांगाडा मिळून आल्याचा प्रकार दि. १४ रोजी उघडकीस आला. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निंभोरा गावातील मोठा वाघोदा रोड लगत असलेल्या उज्वल नरेंद्र पाटील यांच्या मालकीच्या विहरीत दि. १४ रोजी गावातील देवेंद्र सोनवणे या तरुणाने आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती मिळताच सपोनि हरिदास बोचरे, सफौ अभय ढाकणे, अविनाश पाटील, किरण जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने विहरीत काम करणाऱ्यांकडून मृतदेही काढण्यासाठी काही जण विहरीत उतरले होते. त्या तरुणाचा मृतदेह काढत असतांना त्यांना पुरुषाचा मानवी सांगाडा मिळून आला. हा सांगाडा कमरेपासून तर मांडीपर्यंतचा भाग असल्याने निंभोरा पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण करून डीएनए टेस्ट साठी पाठविला आहे. पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी तो सांगाडा भातखेडा शिवारात तो पुरला आहे. याप्रकरणी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अभय ढाकणे व पो हे का. अविनाश पाटील, किरण जाधव करीत आहे. दरम्यान, पोलिसांनी हरवलेल्या व्यक्ती संदर्भात संबंधिताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.