चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील नेताजी चौक परिसरातील गवळी वाडयामधील बाळाप्पा सिदाप्पा गवळी यांच्या घरात तब्बल ४३ साप निघाल्याची घटना उघडकीस आली. यामुळे परिसरातील नागरिक धास्तावले असून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेताजी चौकातील गवळी वाडयात माजी नगरसेवक सुरेश स्वार यांच्या घरासमोर बाळाप्पा सिदाप्पा गवळी हे आपल्या परिवारासह राहतात. त्यांच्या घरात गेल्या १५ दिवसापूर्वी दोन सर्पाचे जोडपे नळाबाहेर तोंड काढत आल्याचे बाळप्पांच्या कुटुंबीयांनी पाहिले होते. तेव्हापासून ते त्या नळावर लक्ष ठेवून होते. दरम्यान, १५ एप्रिलला दोन सर्प नळातून बाहेर निघाले. त्यापाठोपाठ एक- एक करून सर्प बाहेर निघत असल्याचे पाहून बाळप्पा गवळी यांचे कुटुंबीय भयभयीत झाले. त्यानी लागलीच वाघळी येथील माने नावाच्या सर्पमित्राला सर्वांना पकडण्यासाठी घरी आणले. मात्र, एका पाठोपाठ एक सर्प बाहेर निघत असल्याने सर्पमित्राला नळात अधिक सर्प असू शकतात, अशी शंका आली. त्याने लागलीच त्या नळामध्ये पाणी सोडले असता एकापाठोपाठ तब्बल ४३ सर्प नळ्यातून बाहेर आले. या सर्व सर्वांना सर्पमित्र माने यांनी एका बाटलीत गोळा केले. हा प्रकार घडत असताना परिसरातील रहिवाशांनी आश्यर्च व्यक्त केले.
यामुळे नागरिक धास्तावले आहेत. तर हा प्रकार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत सर्पमित्रांनी सांगितले की, सध्या तीव्र उन्हाळ्याचे दिवस असून बाहेरील वातावरण अतिशय उष्ण असल्याने या नळामध्ये सर्वांनी अंडी घालून जन्म दिला असावा. तर ते वातावरणातील बदलामुळे बाहेर आल्याची शक्यता ही त्यांनी व्यक्त केली.