जळगाव : प्रतिनिधी
आजारातून बरे होण्यासाठी सोनपोत मंत्रवून देण्याचा बहाणा करीत वृद्धेच्या गळ्यातील पोत घेत तिला दगड बांधलेली पुडी देऊन एक तोळ्याची सोनपोत दोघांनी लांबविली. हा प्रकार १५ एप्रिल रोजी भजे गल्ली परिसरात भरदिवसा घडला. जिल्हापेठ पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील जामनेगाव येथील कस्तुरबाई लक्ष्मण पाटील (वय ६०) या १५ एप्रिल रोजी जळगावात त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी आल्या. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भजे गल्लीतून जात असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या पाठीमागून आल्या व वृद्धेला मंदिराचा पत्ता विचारला. याविषयी माहिती नसल्याचे वृद्धेने सांगितले असता ५५ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तीने ‘तू आजारी होतीस, तुझ्याकडून पैसे न घेता तुला पोत मंत्रवून देतो. ती देव्हाऱ्यात ठेवायची’ असे सांगून गळ्यातील सोनपोत काढायला लावली. ती पोत कागदामध्ये गुंडाळून दगड आणायला सांगितला. त्यावेळी वृद्धेने खाली वाकून एक दगड दिला व समोरील व्यक्तीने तो कागदामध्ये गुंडाळून वृद्धेला ती पुडी दिली व दोघे निघून गेले.