मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात अनेक दिग्गज नेते पक्ष बदलवीत असतांना आता शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांचे भाऊ माजी आमदार सुभाष तथा पंडितशेठ पाटील आणि भाचे व माजी मंत्री शेकापच्या ज्येष्ठ नेत्या मिनाक्षी पाटील यांचे चिरंजीव ॲड. आस्वाद पाटील यांनी आज शेतकरी कामगार पक्षाला अखेरचा लाल सलाम केला. त्यांनी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला.
रायगड जिल्ह्यात शेकापसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. माझ्या पक्ष प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात भाजप एक नंबरला येणार असल्याचा दावा माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी केला. रायगड जिल्ह्यात मला मानणारा मोठा वर्ग असून त्याचा भारतीय जनता पार्टीला मोठा फायदा होईल, शिवाय आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीत पंडितशेठ पाटील काय आहे ते इतरांना कळेल, असा इशारा त्यांनी शेकाप नेत्यांना दिला.
परिणामी, रायगड जिल्ह्यातील राजकारणात येत्या काळात ढवळून निघणार असून राजकीय समीकरणे बदलतील. विधानसभा निवडणुकीच्यावेळी माजी आमदार पंडीत पाटील यांनी पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा पराभव करण्याकरिता पंडीत पाटील हेच सक्षम उमेदवार असल्याचा दावा त्यावेळी शेकापमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला होता. मात्र पंडीत पाटील यांना तिकीट नाकारुन ते माजी आमदार जयंत पाटील यांच्या स्नूषा चित्रलेखा पाटील यांना देण्यात आले. तिकीट नाकारल्याने पंडीत पाटील आणि पक्षांतील त्यांचे समर्थक नाराज झाले होते.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार महेंद्र यांनी शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील यांना पराभूत केले. त्यानंतर माजी आमदार पंडीत पाटील, आस्वाद पाटील व त्यांच्या समर्थकांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याच निर्णय घेतला होता.भाजपचे कार्यकारी अध्यक्ष माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात माजी आमदार पंडीतशेठ पाटील आणि अॅड. आस्वाद पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी आमदार पंडीतशेठ पाटील यांच्या पत्नी भावना पाटील, खासदार धैर्यशिल पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेष बालदी आणि शेकापचे विविध तालुक्यांतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.