जळगाव : प्रतिनिधी
दागिने बनविण्यासाठी दिलेले नऊ लाख ७० हजार रुपये किमतीचे १४३.८६० ग्रॅम सोने घेऊन संजय शंकर सांतरा (रा. घोरादहा धन्याघोरी, जि. हुबळी, पश्चिम बंगला) व मुस्तफा अली (रा. बागनान, जि. हावडा, पश्चिम बंगाल) हे कारागीर पसार झाले. विशेष म्हणजे १५ वर्षांपासून हे कारागीर कामाला होते. हा प्रकार सप्टेंबर २०२४ मध्ये घडला याप्रकरणी १५ एप्रिल २०२५ रोजी शहर पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पटेल नगरमधील रहिवासी श्यामसुंदर अंबालाल सोनी यांचे सोने व चांदीचे दागिने तयार करण्याचे गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावर दुकान आहे. १३ सप्टेंबर २०२४ रोजी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सकडून दागिने बनविण्यासाठी नऊ लाख ७० हजार रुपयांचे १४३.८६० ग्रॅम सोने आले होते. ते संजय सातरा व मुस्तफा अली याला दागिने बनविण्यासाठी दिले.
सोने दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोनी हे दुकानावर गेले असता, त्यांना दोन्ही कारागिर दिसले नाही. त्यांनी इतर कारागिरांकडे विचारणा केली असता, त्यांनी आम्ही रात्री झोपलेले असताना ते निघून गेल्याचे सांगितले. सोनी यांनी दोघा कारागिरांसोबत संपर्क केला असता त्यांनी आम्हाला महत्त्वाचे काम असल्यामुळे आम्ही निघून आलो, सोने आठ ते दहा दिवसात परत करु असे त्यांनी सांगितले. काही दिवसांनी दोघांचे मोबाईल बंद येऊ लागले. त्यामुळे सोनी यांनी १५ एप्रिल रोजी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून संजय शंकर सातरा व मुस्तफा अली या दोघांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.