जळगाव : प्रतिनिधी
भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार महिला जखमी झाली. हा अपघात सोमवारी (१४ एप्रिल) दुपारी १२ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीवर झाला. अपघातानंतर महिलेला तिच्या मुलाने खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, धडक देणाऱ्या डंपरचा अर्धा क्रमांक पुसलेला होता, तरी तो शहरातून ये-जा करीत होता.
अजिंठा चौफुलीवर वाहनाच्या शोरूमनजीक वळणाजवळ इच्छादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कविता सोनवणे (रा. कुसुंबा, ता. जळगाव) दुचाकीने (क्र. एमएच १९ सीटी ५२३६) मुलासह जात असताना एका डंपरने जोरदार धडक दिली. यात महिलेला दुखापत होण्यासह दुचाकीचेही नुकसान झाले.