अमळनेर प्रतिनिधी । डांगरी येथे दुचाकीने जात असलेल्या व्यक्तीला मध्यरात्री आडवून रोकड व मोबाईल चोरून नेला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, उदय नथू कापडणे (वय-५०) रा. डांगर ता.अमळनेर हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार २९ मार्च रोजी १२ वाजेच्या सुमारास ते धुळे येथील किर्तनाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने घरी येत होते. अमळनेर तालुक्यातील चोपडाई गावाजवळ दुचाकीवरून येत असताना अज्ञात तीन जणांनी त्यांची दुचाकी अडवली व जबरी त्यांच्या हातातील मोबाईल आणि ५ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी उदय कापडणे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील करीत आहे.