रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील मोठे वाघोदे येथे मुलीचे लग्न ठरलेले… सोहळा सात दिवसांवर येऊन ठेपला.. अशातच येथील जवानाचे अल्प आजाराने निधन झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मोठा वाघोदा येथील बुधो राजाराम कचरे (५६) या सीआयएसएफमधील जवानाचे १२ रोजी अल्प आजाराने निधन झाले. बुधो कचरे यांच्या मुलीचा विवाह १९ एप्रिल रोजी असल्याने दोन दिवसांपूर्वी कचरे हे आपल्या मूळ गावी आले होते. देश सेवेबरोबर घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या जवानाचा असा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने भुसावळ येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे उपचार न झाल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले. परंतु रस्त्यात त्रास अधिकच वाढल्याने त्यांना नाशिक येथेच एका रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथेच त्यांचे निधन झाले.
कचरे यांच्यावर मोठे वाघोदा येथे रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्कल अमोल चौधरी, सावदा पोलिस स्टेशनचे स.पो.नि. विशाल पाटील व सीआरपीएफ युनिटचे पथक उपस्थित होते. कचरे पश्चात पत्नी, मुलगा, सून, आई, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. त्यांनी सुमारे ३५ वर्षे देशसेवा केली. या ३५ वर्षामध्ये त्यांनी २२ राज्यांमध्ये सेवा दिली.