पारोळा : प्रतिनिधी
फास्टटॅग स्कॅनिंग न झाल्याच्या कारणावरुन सबगव्हाण येथील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून बस वाहकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चार ते पाच जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर येथून ठाणे जाण्यासाठी निघालेली (एमच १४, एलएक्स ३७२८) क्रमांकाची बस दुपारी तीन वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यातील सबगव्हाण टोलनाक्यावर पोहचली. येथे फास्टटॅकच्या माध्यमातून स्कॅनिंग करण्यासाठी लेनवर जात असतांना तांत्रीक अडचणींमुळे स्कॅन झाले नाही. एक नव्हे तर तीन लेनवरुन बसने स्कॅन केल्यानंतर देखील तांत्रीक अडचण निर्माण होत होती. त्यामुळे टोल कर्मचारी व वाहक जितेंद्र कल्याण बोरसे यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी टोलवरील कर्मचाऱ्यांनी वाहकाला बसमधून ओढून मागच्या बाजूला नेवून त्याठिकाणी बेदम मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे जितेंद्र बोरसे हे गंभीर जखमी झाले.
टोल कर्मचारी देविदास सोमा सैंदाने यांच्यासह इतर चार ते पाच इसमांनी वाहकाला मारहाण करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी जितेंद्र बोरसे यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.