जळगाव : प्रतिनिधी
तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी करुन बोगस आदेश तयार करणारा मुख्य सूत्रधार अॅड. शेख मोहम्मद रईस मोहम्मद इद्रिस बागवान व अॅड. शेख मोहसीन शेख सादीक मन्यार या दोघांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
जन्म दाखल्यांसाठी तहसीलदारांची बनावट स्वाक्षरीने बोगस आदेश प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून याप्रकरणी ४३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करतांना सुरुवातीला प्रकरणे दाखल असलेल्या अर्जदार हे बांग्लादेशी आहेत की, भारतीय याची पडताळणी साठी त्यांची भारतीयत्व असल्याची कागदपत्रे सादर करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास वेगवेगळ्या दिशेने केला जात आहे.
तहसीलदारांचे बनावट आदेश तयार करुन त्यावर त्यांचा शिक्का मारणारा मुख्य संशयित अॅड. शेख मो. रईस बागवान याच्यासह त्याचा साथीदार एजंट अॅड. शेख मोहसीन मन्यार या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वेगवेगळ्या मार्गाने तपास करीत आहे