यावल : प्रतिनिधी
५५ वर्षीय महिला दुचाकीने यावलला येत असताना तालुक्यातील साकळी बसस्थानकाजवळ दुचाकी चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडला. या अपघातात अरुणा सुधाकर पाटील (५५, रा. यावल) ही महिला ठार झाली. याप्रकरणी दुचाकीचालक लोटन भास्कर पाटील (रा. मनवेल) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, साकळी, ता. यावल या गावातील बसस्थानकाजवळ अंकलेश्वर बहऱ्हाणपूर राज्य मार्गावरून लोटन पाटील यांच्या दुचाकीवर मागे बसून अरुणा पाटील (रा. तिरुपतीनगर, यावल) या येत होत्या. दरम्यान, लोटन पाटील यांनी निष्काळजीपणाने दुचाकी भरधाव वेगात चालवली आणि अपघात घडला. या अपघातात अरुणा पाटील यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात सुधाकर पाटील यांच्या फिर्यादीवरून लोटन पाटील यांच्या विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहेत.