पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंप्री सार्वे येथील एका घरातून पाच लाखांचे दागिने चोरून नेणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंदराव रूपचंद पाटील यांच्या घरातून हे पाच लाखांचे दागिने अज्ञाताने चोरून नेले होते. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पिंपळगाव हरे. पोलिस स्टेशनचे सपोनि. प्रकाश काळे आणि कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरविली. तपासामध्ये संशयित म्हणून आनंदराव पाटील यांच्या शेजारीच राहणाऱ्या राजेंद्र किसन पाटील याला ताब्यात घेऊन खाकीचा हिसका दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला.
५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे, दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, चांदीचे पायातील पैंजण असा सुमारे ४ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस तत्काळ अटक करण्यात आली असून, तपास हेकॉ नरेंद्र नरवाडे हे करीत आहेत. सपोनि प्रकाश काळे, पोउनि प्रकाश पाटील, पोलिस अमोल पाटील, नामदेव इंगळे, इमरान पठाण यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.