जळगाव : प्रतिनिधी
पिंप्राळा भागातील सेंट्रल बैंक कॉलनी भागातून एका मजुराच्या घरातून, मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले दागिने व काही रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ७ एप्रिल रोजी समोर आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, संजय सुकदेव भोई (वय ५४) हे मजुरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १९ व २० एप्रिल दरम्यान मुलीचे लग्न असल्यामुळे लग्नासाठी सुकदेव भोई यांनी काही सोन्याचे दागिने घेतले होते. तसेच काही दिवसांपूर्वी ते आपल्या परिवारासह मुलीच्या लग्नासाठी साड्या व कपडे घ्यायला सुरत येथे गेले होते. ते सोमवारी आपल्या घरी परतले. घरी परतल्यानंतर घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून २० हजार रुपये किमतीची सोन्याची लगड, १० हजार रुपयांच्या ६ भार वजनाच्या चांदीच्या साखळ्या असा एकूण ३० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. या प्रकरणी सोमवारी सायंकाळी संजय भोई यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.