मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या तीन दिवसापासून पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मोठ्या चर्चेत आले होते. तनिषा भिसे या गरोदर महिलेला दीनानाथ रुग्णालयात गंभीर स्थितीत प्रसूतीसाठी आणण्यात आले होते. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना 10 लाखांचे डिपॉझिट भरल्यानंतरच दाखल करून घेण्याची भूमिका घेतली होती. परिणामी, वेळेवर उपचार न भेटल्यामुळे तनिषा यांचा मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने प्राथमिक अहवालात देखील मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय कोण चालवतंय? मुख्यमंत्र्यांना त्याचा बचाव करावा लागतोय का? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.
आदित्य ठाकरेंची पोस्ट काय?
ज्या संस्थेने प्रसूतीसाठी एका महिलेकडून 10 लाख रुपये मागितले होते, त्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चालवणाऱ्या ट्रस्ट आणि संस्थेविरोधात मुख्यमंत्री फडणवीस कारवाई करतील का? याकडे सर्वांचे लक्ष आहे, असे आदित्य ठाकरे आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न देखील उपस्थित केले. गर्भवती महिलेचे नातेवाईक ही खंडणी देण्यास असमर्थ ठरल्याने तिचा मृत्यू झाला. पण प्रश्न असे आहेत की, अंतर्गत समितीने अनामत रक्कम मागितल्याचा आरोप फेटाळला, तरी काल एका डॉक्टरने कबूल केले आणि पदाचा राजीनामा दिला. रुग्णाला न वाचवता स्वतःचा बचाव करण्याकरता वेगवेगळ्या गोष्टी रचणाऱ्या रुग्णालयावर पुणेकर विश्वास कसा ठेवू शकतात? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी यांनी उपस्थित केला.
जर रुग्णालय खंडणीची (डिपॉझिट) मागणी करत असेल, तर रुग्णालयाच्या कर आणि महापालिकेच्या देयकांचे काय? ते देयके कोट्यवधींमध्ये आहे! या यंत्रणा रुग्णालय चालवणाऱ्या ट्रस्टी आणि एजन्सींचे दरवाजे ठोठावतील का? हे रुग्णालय कोण चालवत आहे आणि ते इतके प्रभावी का आहेत की मुख्यमंत्र्यांना त्याचा बचाव करावा लागतो? असे प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी विचारले आहेत.