जळगाव : प्रतिनिधी
“धरण होणार म्हणून मी जमीन घेतली नव्हती. ती जमीन माझ्या वडिलांच्या नावावर असून 100 वर्षांपूर्वीचे उतारे सुद्धा काढले तरी तेच समोर येतील,” असे स्पष्ट शब्दांत स्पष्टीकरण माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहेत. गिरीश महाजन यांच्या आरोपांना उत्तर देताना खडसे यांनी खुलासा केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी आणि राजकीय महामार्गासाठी भूसंपादन झालेल्या जमिनीसंदर्भात अधिकाऱ्यांबरोबर तीन ते चार तास बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना खडसे म्हणाले, “भूसंपादन, पुनर्वसन, ग्रामपंचायत विभाजन यासह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. इंदूर-हैदराबाद महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना मागील कायद्यानुसार पाचपट मोबदला मिळत होता. आता मात्र फक्त दोनपट मोबदला दिला जात आहे.”
खडसे पुढे म्हणाले, “धरणाच्या वेळेस काही माजी मंत्र्यांनी धरण होणार म्हणून जमिनी घेतल्या आणि त्यावर पडताळा दाखवून शासनाकडून 9.5 ते 14 कोटी रुपये मोबदला घेतला. मी मात्र तशी जमीन विकत घेतलेली नाही. ती जमीन माझ्या वडिलांच्या नावावर आहे. गिरीश भाऊंनी याची एकदा चौकशी करून गैरसमज दूर करावा.” महाजन यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना खडसे म्हणाले, “ते मोठे माणसे आहेत, मंत्रिमंडळात आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे सहकारीही आहेत. त्यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे.” मुक्ताईनगर पुनर्वसनाबाबतही यावेळी चर्चा झाली. “1976 चा जीआर असून त्यावेळी नागरी सुविधांसाठी निधी उपलब्ध नव्हता. आता नवीन जीआर निघाल्यामुळे नागरी सुविधांसाठी 15 कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत,” अशी माहितीही खडसे यांनी यावेळी दिली.