छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथे एका व्यापारी संकुलाच्या बांधकाम साईटवरील बेसमेंटमध्ये काम करणाऱ्या मजुरांवर मुरूम कोसळून 2 जण ठार, तर 3 जण जखमी झालेत. बीड पायपास वरील संग्राम नगर उड्डाण पुलाशेजारी ही घटना घडली आहे. संग्राम नगर उड्डाणपुलाच्या शेजारी कॅपिटल ट्रेड सेंटर (सीटीसी) या व्यापारी संकुलाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यासाठी 60 ते 70 फूट खोल मोठा खड्डा खोदण्यात आला आहे.
या खड्ड्यात इमारतीचा पाया व बेसमेंटचे काम सुरू होते. मंगळवारी सकाळी या ठिकाणी 5 हून अधिक मजूर काम करत होते. त्यावेळी अचानक आमदार रोड लगतचा मुरुम ढासळला आणि तो थेट खाली काम करणाऱ्या मजुरांवर पडला. या घटनेत 2 मजूर ठार झाले असून, 3 जण जखमी झालेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुरूम खाली असणाऱ्या कॉलमच्या लोखंडी गजांवर पडला. त्यानंतर मुरुम, गज व दगडांच्या एकत्रित मार लागून मजुरांचा बळी गेला, असेही या प्रकरणी सांगितले जात आहे.
दुसरीकडे, या दुर्घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळी सुरू असलेल्या बांधकाम साईटवर सुरक्षिततेसंबंधी करण्यात आलेल्या सूचनांची व उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात होती का? याची चौकशी महापालिकेमार्फत केली जाणार असल्याचे सांगितले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड बायपास परिसराचा झपाट्याने विस्तार होत आहे. या बायपासच्या दुतर्फा मोठमोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स होत आहेत. दुर्घटना घडलेले ठिकाण हे शहरातील शहानूरमियाँ दर्गा चौकापासून हाकेच्या अंतरावर आहे. सीटीसी मॉलचे बांधकाम संग्रामनगर उड्डाण पुलाला अगदी चिकटून सुरू आहे. या पुलाखालून आमदार रोडकडे जाताना नागरिकांना आपले वाहने घेऊन उलट्या दिशेने जावे लागते. त्यामुळे येथे नेहमीच छोटे-मोठे अपघात घडतात. त्यामुळे सातारा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नेहमीच आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.