छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून जबर मारहाण करत अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची घटना आता ताजी असतांना आता संभाजीनगरमध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील टेंडरच्या वादातून बांधकाम ठेकेदारासह त्याच्या मित्राचे अपहरण करत डांबून बेल्ट, रॉड, केबलने दहा ते पंधरा जणांनी विवस्त्र करत अमानुष मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.६) मध्यरात्री दोन ते साडेचार वाजण्याच्या सुमारास सुधाकरनगर भागात घडली आहे. या प्रकरणी पोलिस पुत्र शरद भावसिंग राठोड (वय-३३, रा. कुमावतनगर, देवळाई चौक, सातारा परिसर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला अटक केली आहे. पोलिस पुत्र संदीप भाऊसाहेब शिरसाठ (रा. सुधाकरनगर), त्याचा भाऊ पोलिस कर्मचारी मिथुन शिरसाठ, स्वप्नील गायकवाड, हर्षल, निखिलेश कांबळे व इतर दहा ते पंधरा अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद राठोड हे बांधकाम ठेकेदार आहेत. अभिजित ऊर्फ बंटी बाबासाहेब बर्डे (२८) याच्यासोबत सहा वर्षींपासून मैत्री आहे. आरोपी संदीप शिरसाठ यासही शरद हे लहानपणापासून ओळखतात. संदीपचा प्रॉपटी खरेदी-विक्री आणि बांधकाम व्यवसाय आहे. बंटी हा संदीप शिरसाठ यास शासकीय बांधकामाचे टेंडरच्या कामासाठी मदत करत होता. परंतु, शिरसाठ त्याला जेवण देत नव्हता. मारहाण करायचा. त्यामुळे बंटीने शरद यांच्याकडे काम करण्यास सुरुवात केली होती.
त्यामुळे शिरसाठच्या त्याच्यावर राग होता. रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हॉटेल साईस्वराज गुरु लॉन्सच्या बाजूला, बायपास येथून शरद हे जेवण करून घरी जाण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा गेटवर आरोपी संदीप शिरसाठ, त्याचा भाऊ पोलिस कर्मचारी मिथुन शिरसाठ, स्वप्नील गायकवाड, हर्षल हे फॉर्च्यूनर गाडीने आले.
त्यांनी ऑफिसचे काम असल्याचे सांगून शरदला सुधाकरनगर येथील ऑफिसमध्ये घेऊन गेले. तिथे अन्य दहा ते पंधरा जण होते. सर्वांनी शरद याना अर्धा ते पाऊण तास बेल्ट, केबल, रॉडने, लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्याचा मोबाईल, दुचाकीची चावी घेऊन गळ्यातील सोनसाखळी काढून घेतली. संदीपने ठेकेदाराच्या डोक्याला पिस्तूल लावून जिवे मारून डोंगरात फेकण्याची धमकी दिली.
दरम्यान, ठेकेदाराने सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पोलिस आयुक्तालयात धाव घेत बेगमपुरा पोलिस ठाण्यात टाकणारं दाखल केली. गुन्हा नोंद होऊन सातारा पोलिसाकडे वर्ग झाला. याची कुणकुण लागताच सकाळी स्वतःहून संदीप शिरसाठ सातारा पोलिस ठाण्याकडे येताच त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने ११ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक संग्राम ताठे, एपीआय शैलेश देशमुख यांनी दिली.