जळगाव : प्रतिनिधी
भंगार विक्रेत्याकडून जप्त केलेल्या बनावट नोटा प्रकरणात या नोटांचे सिंडीकेट चालविणाऱ्या डॉ. प्रतिक सुरेश नवलखे (४३, रा. ब-हाणपूर, मध्यप्रदेश) याला जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली. त्याला ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. डॉ. नवलखे हा पाच महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
बनावट नोटा चलनात आणणाऱ्या चेतन सावकारे याला जिल्हापेठ पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून पाचशे रुपये दराच्या ९८ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी खंडवा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या मोहम्मद हकीम आमीन याची चौकशी केली असता, त्याने या बनावट नोटा मध्यप्रदेशात डॉ. प्रतिक नवलखे याच्याकडून घेतल्याचे सांगितले होते.
बनावट नोटांचे सिंडीकेट चालविणारा प्रतिक नवलखे याचे एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण झाले असून शासकीय रुग्णालयात कार्यरत असताना तेथील साहित्याची अफरातफर केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात कारागृहात असताना त्याची बनावट नोटांचे सिंडीकेट चालविणाऱ्यांशी ओळख झाली आणि तो यामध्ये सहभागी झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.