रावेर : प्रतिनिधी
मध्य प्रदेशातील विरोदा ते सीमेवरील पाडळे बु-अहिरवाडी या आंतरराज्य मार्गाने मध्य प्रदेशातून रावेरकडे गायी व त्यांच्या चार वासरांची अवैध वाहतूक करणारे लालमाती, ता. रावेर येथील मालवाहू वाहन रावेर पोलिसांनी पाडळे-अहिरवाडी रस्त्यावर पकडून १० गायींची सुटका केली. वाहन मालक व चालकासह तीन अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, ही घटना ६ एप्रिल रोजी दुपारी घडली. पोकॉ. श्रीकांत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांत आरोपी वाहनमालक रामसिंग ऊर्फ भाया रायसिंग अजनारे व चालक आकाश शांताराम आवले (बारेला) (दोन्ही रा. लालमाती, ता. रावेर) व अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, अवैध गुरांची वाहतूक नेहमीच होत असते. हे प्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र पथक असायला हवे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.