छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद सुरु झाल्यानंतर आता औरंगजेबाची कबर असलेले खुलताबादचे नाव रत्नपूर होते. औरंगजेबाने ते बदलून खुलताबाद केले. देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद केले. खुलताबादचे नामांतर होणार असून दौलताबादचेदेखील नामांतर होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
संजय शिरसाट म्हणाले, औरंगजेबाने त्याच्या काळात जे काही कारनामे केले आहेत त्यामुळे अनेक शहरांची नावे बदलली. धाराशिवचे नाव बदलले गेले. नगरचे नाव बदलले गेले. हे सगळे ‘बाद’ ‘बाद’ आहे ना त्यांची नावे बदलण्याची प्रोसेस आम्ही करीत आहोत. औरंगजेबाची कबर हटवावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटले. नागपूरमध्ये दंगलदेखील झाली. यानंतर आता औरंगजेबाची कबर असणाऱ्या तालुक्याचे नाव बदलणार, असे त्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्याला वाढीव निधीसाठी प्रयत्न करू. आम्ही १२०० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र जिल्हावार्षिक योजनांच्या निधीला कट लागला आहे. त्यामुळे अपेक्षित निधी मिळाला नाही. त्यामुळे आता पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून वाढीव निधी मागितला जाणार आहे. सध्या नागरिकांना दहा ते पंधरा दिवसांआड पाणी मिळत आहे. योजना पूर्ण न झाल्यास लोक त्यांना जोड्याने मारतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.