मुंबई : वृत्तसंस्था
आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत सनसनाटी आरोप केला आहे. गिरीश महाजन यांचे महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचे एकनाथ खडसे म्हणालेत. यासंदर्भात अमित शहा यांच्याकडे कॉल रेकॉर्ड असल्याचा दावा देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसेंच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी आपली एक क्लिप प्रकाशित केली. त्यात असे म्हटले आहे की, गिरीश महाजन यांच्या ‘रंगला रात्री अशा’, त्यात त्यांनी डिटेल सांगितले आहे की, गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. तिचे नाव मला माहित आहे. पण ते सांगणे उचित होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार घाणेरडी भाषा करायची. काही सिद्ध करता येत नाही. काहीतरी चरित्रहणन करायचं, याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेले नाही. त्यांनी एक पुरावा दाखवावा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन. अमित शहा यांना काय पुरावा दाखवता? तुमच्याकडे पुरावा असेल तर तो लोकांना दाखवा. यांना दिले, त्यांना दिले माझ्या मोबाईलमध्ये होते, डिलिट झाले, मोबाईल हरवला हे खोटं बोलताना लाज वाटत नाही का? माझे आव्हान आहे त्यांनी एक पुरावा दाखवावा. माझा अंत बघू नका, असा इशाराही महाजन यांनी खडसेंना दिला.
गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार, असा इशारा दिला आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, तुम्ही गिरीश महाजन यांना बदनाम करू नका. एकनाथ खडसे तुम्ही माफी मांगा. जर माफी नाही मागितली तर राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार. हे नीच वागणे झाले, सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली, त्यांची वैचारिक दिवाळखोरी झाली आहे. राज्यपालांकडे 100 कोटीच्या घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी केस पेंडींग आहेत. त्यांचा खोटा बुरखा फाडला जाईल, असे सदावर्ते म्हणाले आहेत.