जळगाव : प्रतिनिधी
जन्म दाखल्यांच्या नोंदीसाठी तहसीलदारांचे बनावट आदेश तयार केल्याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी केली जात असून मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
जन्म-मृत्यूचे दाखल्यासाठी तहसीलदारांचे बनावट आदेश तयार केल्याप्रकरणी ज्यांनी जन्मदाखले घेतले त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी तर केली जात आहेच शिवाय या प्रकरणात तहसीलदारांचे बनावट आदेश तयार करण्याच्या संशयावरून दोन जणांना एलसीबीने ताब्यात घेतले आहे. त्यांची विविध मुद्यांवर चौकशी केली जात आहे. आता दोन जण ताब्यात घेतले असले तरी यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात असून पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मुंबईचे संशयित असण्यासह जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या रहिवाशांनीही जन्म दाखले काढले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध मुद्यांच्या आधारे तपास करण्याचे आव्हान असून हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.